

नागपूर: जिल्ह्यातील शेतकरी सध्या कर्जमुक्ती आणि आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले असतानाच, जिल्ह्यातील एका हतबल शेतकऱ्याच्या कृतीने पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नाची भीषणता अधोरेखित केली आहे. जवळी गावातील विजय अंभोरे यांनी पेरणी, कापणीचा खर्चही परवडत नसल्याने आपल्या शेतातील संपूर्ण सोयाबीनला आग लावून दिली आहे.
विजय अंभोरे यांच्याकडे ४ एकर शेती आहे. त्यांनी बँकेकडून १.७० लाखांचे कर्ज घेऊन सोयाबीनची पेरणी केली होती. मोठ्या मेहनतीने त्यांनी सोयाबीनची कापणी केली, मात्र २५-२६ ऑक्टोबरला सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. पावसामुळे सोयाबीन पूर्णपणे खराब झाले आहे.
हताश झालेल्या अंभोरे यांनी ४ हजार रुपये खर्च करून मजूर लावून हे खराब झालेले सोयाबीन एकत्र केले. परंतु, आता यातून उत्पादन खर्चही निघणार नाही हे स्पष्ट झाल्यावर, कुठलाही पर्याय न उरल्याने त्यांनी अखेर हे सर्व सोयाबीन पेटवून दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, शेतीत मेहनत करूनही पदरी फक्त निराशा आणि कर्जच येत असल्याने शेतकरी किती गंभीर संकटात आहेत, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.