

Leopard in Cowshed Deolapar
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील देवलापार परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती पुढे आली. जंगलातून आलेला एक बिबट्या थेट मनोज सांगोळे यांच्या घरालगतच्या गोठ्यात शिरला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना रविवारी (दि.२२) सकाळी सुमारे ११ वाजता घडली.
एकीकडे हा बिबट्या तब्बल सहा तास गोठ्यात अडकून राहिल्याने कुटुंबीय आणि गावकरी प्रचंड घाबरले होते. दुसरीकडे वनविभागाची रेस्क्यू टीम बरीच उशीरा घटनास्थळी पोहोचली. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी वापरली जाणारी ‘डार्ट’ सिस्टीम औषधी अभावी बंद असल्याने या कारवाईत मोठा विलंब झाल्याने लोक संतापले.
तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ही घटना सकाळी सुमारे ११ वाजता घडली. त्यावेळी घरातील मुलगा अंगणात होता. अचानक बिबट्या गोठ्यात शिरल्याचे दिसताच एकच गोंधळ उडाला. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे उपलब्ध नव्हती. ही औषधे इतर राज्यातून आणावी लागतात, त्यामुळे कारवाई उशिरा झाली.
या घटनेनंतर वनविभागावर निष्काळजीपणाचे आरोप होत आहेत. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा घटनांसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.