

नागपूर - आज उत्तर नागपुरातील राजीव नगरात फिरणाऱ्या बिबट्याचा फोटो शहरात व्हायरल होताच पुन्हा एकदा खळबळ माजली. भांडेवाडी,पारडी पाठोपाठ उत्तर नागपुरातील या बिबट्याच्या वास्तव्याने नागरिकात दहशत होती. मात्र, राजीव नगरातील बिबट्याचा फोटो वास्तविक नसून एआयचा आधार घेतल्याचे म्हटले जात आहे.
वन विभागाने त्या भागात बिबट अस्तित्व दिसले नसल्याचे म्हणणे आहे. पूर्व नागपुरातील दाट वस्ती असलेल्या पारडी क्षेत्रातील शिवनगर परिसरातील काजल बिअर बारजवळ एका घरात बुधवारी सकाळी बिबट्या थेट वरच्या माळ्यावर शिरल्याने नागरिक सुमारे चार तास चांगलेच दहशतीत होते. वनविभाग, रेस्क्यू टीममार्फत अखेर तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
त्यापूर्वी सात लोकांना या बिबट्याने जखमी केले. त्यांना पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. माहिती मिळताच वनविभाग, कलमना पोलीस आणि पिंजऱ्यासह रेस्क्यू टीम दाखल झाली. यापूर्वी मनपाच्या 5 नंबर नाक्याजवळ सोमवारी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिक दहशतीत होते. भांडेवाडी परिसरात राऊत यांच्या निवासस्थानी दुसऱ्या माळ्यावर एका बिबट्याने चार तास बस्तान मांडले होते.