

Nagpur Cyber Police Mast Money App Scam
नागपूर : झटपट ऑनलाइन कर्ज देण्याचे आमिष दाखवत 'मस्त मनी' या मोबाईल अॅपच्या माध्यमातून देशभरातील सुमारे पाच लाख नागरिकांची जवळपास २०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने मध्य प्रदेशातील भोपाळ येथून एका संशयिताला अटक केली असून तो सॉफ्टवेअर अभियंता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्राथमिक तपासानुसार, आरोपीने 'मस्त मनी' हे अॅप विकसित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून १५ हजार रुपयांपर्यंत झटपट ऑनलाइन कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष नागरिकांना दाखवले. या जाहिरातींना भुलून देशभरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी अॅप डाउनलोड करून कर्जासाठी अर्ज केला.
मात्र, अॅप डाउनलोड करताच वापरकर्त्यांच्या मोबाईलमधील माहिती आणि कर्ज प्रक्रियेवरील नियंत्रण आरोपींच्या टोळीच्या हाती जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर संबंधित नागरिकांना ब्लॅकमेल करून १५ हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम व्याजासह वसूल केली जात होती. पैसे न दिल्यास संबंधितांची वैयक्तिक माहिती आणि संपर्क यादी सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी दिली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
नागपूरमधील दोन नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सुरू झालेल्या तपासातून या टोळीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.