Nagpur | ‘आयआयटी’त बी.टेक., ‘आयआयएम’मधून एमबीए व्हा ५ वर्षांत

प्रवेशासाठी फक्त जेईई पात्रता ग्राह्य धरण्याचा ‘नागपूर आयआयएम’चा निर्णय
Nagpur |
Nagpur | ‘आयआयटी’त बी.टेक., ‘आयआयएम’मधून एमबीए व्हा ५ वर्षांत
Published on
Updated on

नागपूर; वृत्तसंस्था : भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच आयआयएम नागपूरने देशातील आयआयटी संस्थांशी सामंजस्य करार करून पाच वर्षांचा विशेष संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आयआयटीमधून बी.टेक. आणि आयआयएममधून एमबीए अशी दुहेरी पदवी अवघ्या ५ वर्षांत मिळवता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी वेगळी प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून जेईई पात्रता ग्राह्य धरली जाणार आहे.

आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांची पुढील पाच वर्षांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नुकतीच पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेच्या आगामी महत्त्वाकांक्षी योजनांचा तपशील मांडताना या संयुक्त अभ्यासक्रमाची माहिती दिली. या नव्या शैक्षणिक प्रारूपांतर्गत, विद्यार्थ्यांना साडेतीन वर्षांत आपले बी.टेक. पूर्ण करावे लागेल. त्यानंतर पुढील दीड ते अडीच वर्षांत आयआयएम नागपूरमधून व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण पूर्ण करता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना दोन पदव्या मिळवण्यासाठी पूर्वी लागणारा ६ ते ७ वर्षांचा कालावधी आता एकात्मिक पद्धतीने अवघ्या ५ वर्षांत पूर्ण करता येणार आहे.

लवकरच अभ्यासक्रम प्रत्यक्षात येणार

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आयआयएम नागपूरमधील एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र परीक्षा (जसे की कॅट) देण्याची आवश्यकता भासणार नाही. विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेतील पात्रता हीच या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल. आयआयएम नागपूरच्या शैक्षणिक परिसराच्या विस्ताराचे काम वेगाने सुरू असून लवकरच हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात आणला जाईल, असे संकेत डॉ. मेत्री यांनी दिले.

विशेष आराखडा तयार

संस्थेने २०२६ ते २०३१ या आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी एक विशेष विकास आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत आयआयएम नागपूरचा विस्तार पुणे आणि गोवा येथे करण्याचे नियोजन आहे. तसेच, येत्या काळात जगातील २० आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी भागीदारी करून ‘ग्लोबल’ दुहेरी पदवी कार्यक्रम सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नव्या अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्री ४.०, डिजिटल तंत्रज्ञान आणि उत्पादन व्यवस्थापन यासारख्या आधुनिक क्षेत्रांवर मुख्य भर दिला जाईल.

पायाभूत सुविधांचे जाळे उभारणार

पुढील पाच वर्षांत आयआयएम नागपूरला जगातील आघाडीच्या १०० आणि आशियातील पहिल्या १० व्यवस्थापन संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्याचे मोठे ध्येय आहे. यासाठी पायाभूत सुविधांमध्ये ३०० क्षमतेचे नवीन वसतिगृह, मोठी खानावळ, अत्याधुनिक ग्रंथालय आणि सभागृह उभारले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news