

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील पेट्रोल पंपावर तब्बल ५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीचा नागपुरात पोलिसांच्या ताब्यात असताना विषप्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अमित भगत (वय ३०, रा. कळंब, जि. यवतमाळ) असे मृत आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून, पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्याकडे उंदीर मारण्याचे औषध आले कसे? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
कळंब पोलिसांचे एक पथक अमित भगत याचा शोध घेण्यासाठी नागपुरात आले होते. अमित हा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलीस आणि महिला कर्मचारी त्याच्या घरी पोहोचले; मात्र तो तेथे आढळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, अमित हा नागपुरातील एका पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी पेट्रोल पंपावर पोहोचले. त्याचवेळी अमितने विषारी औषध प्राशन केले.
घटना लक्षात येताच यवतमाळ पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेत हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आणले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असतानाच अमित भगतचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने विषारी औषध प्राशन केल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः ताब्यात असलेल्या आरोपीकडे उंदीर मारण्याचे औषध पोहोचले कसे, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, विषप्राशन करण्यापूर्वी अमितने गुटखा खाल्ल्यामुळे आपली प्रकृती बिघडल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, विषारी औषध त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा शोध पोलीस घेत आहेत.