

नागपूर : रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या एका दाम्पत्याला भरदिवसा लुटल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात घडली आहे. रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वारांनी कारचा पाठलाग करत वाहन अडविले आणि चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याकडील सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. या घटनेचा थरारक व्हिडिओ पीडित दाम्पत्याच्या मुलीने मोबाईलमध्ये कैद केला असून तो पोलिस तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. मात्र, घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास सुशांत हजारे हे पत्नी आणि मुलीसह कारने बुटीबोरीकडे जात होते. नागपूर-फुकेश्वर-बुटीबोरी मार्गावर त्यांचा रस्ता चुकल्याने त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना मार्ग विचारला. दोन्ही तरुणांनी त्यांना रस्ता दाखवला. मात्र, त्यानंतर काही अंतरावर त्यांनी हजारे यांच्या कारचा पाठलाग सुरू केला.
कार थांबविल्यानंतर दोन्ही आरोपींनी चाकूचा धाक दाखवत सुशांत हजारे यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. या दागिन्यांची किंमत अंदाजे १ लाख २६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. लूट केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून हुडकेश्वरच्या दिशेने पसार झाले.
मुलीने टिपला संपूर्ण प्रकार
घटनेवेळी कारच्या मागील सीटवर बसलेल्या हजारे यांच्या मुलीने प्रसंगावधान राखत संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. या व्हिडिओमध्ये आरोपी चाकू दाखवत धमकावत असल्याचे स्पष्ट दिसत असून, पोलिसांसाठी हा व्हिडिओ तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी मार्ग बदलून तेथून पळ काढला. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह
भरदिवसा आणि वर्दळीच्या मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा व्हिडिओ आणि इतर पुरावे उपलब्ध असूनही तीन दिवसांनंतर आरोपी गजाआड झाले नसल्याने पोलिसांच्या तपासाच्या गतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.