

नागपूर : नागपूर पारडी हद्दीतील भांडेवाडी परिसरात एक तरुण चाकू घेऊन खुलेआम फिरत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले . पण आरोपीच्या आईची पोलिसांशीच झटापट झाली. तिने पोलिसांनाच धक्काबुक्की केली. यात एक पोलिस अंमलदार जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या गुन्हेगाराला पकडून अटक करण्यात आली. कौंटुंबीक वादानंतर आरोपीने त्याच्या नातेवाईकावर हल्ला करण्याच्या उद्देशाने चाकू काढल्याचे तपासात समोर आले आहे.
पारडी पोलीस ठाण्याच्या भांडेवाडी परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव किरण सडमाके असल्याचे सांगितले जात आहे. किरणवर खुनाचा प्रयत्न आणि हल्ला असे पाच गुन्हे आधीच दाखल आहेत. तो काही काळापासून त्याच्या घरापासून दूर राहत होता आणि दोन दिवसांपूर्वीच परिसरामध्ये राहायला आला होता. घटनेच्या दिवशी त्याचे एका नातेवाईकाशी भांडण झाले होते. नातेवाईकाने शिवीगाळ केल्यानंतर तो त्याला मारण्यासाठी चाकू घेऊन धावला. लोकांनी त्याला चाकू घेऊन जात असताना बघितले. या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पारडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि किरणला अटक करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी किरणची आई अनिता सडमाके हिने पोलिसांशी वाद घातला. जेव्हा पोलिस अंमलदार शैलेश कुंबडकर तिला अटक करण्यासाठी पुढे आले तेव्हा तिने त्यांना ढकलले असता ते खाली पाडले. यात हेड कॉन्स्टेबलच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पोलिसांनी आरोपी किरणलाही अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.