

Nag River Pollution Issues
नागपूर : केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने देशातील प्रदुषित नद्यांबाबत दिलेल्या अहवालात नागपूरच्या नाग नदीचा समावेश केला नाही. काँग्रेसने या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत केंद्रीय पर्यावरण खात्याला धारेवर धरले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केतन विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आज (दि.४) पर्यावरण खात्याच्या अधिकार्यांना 9 सील बंद बाटल्यांमध्ये नाग नदीच्या दुषित पाण्याचे नमुने सोपविले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिव्हिल लाईन्स नागपूर येथील केंद्रीय सचिवालयातील पर्यावरण विभागात धडक देताच वातावरण तापले. काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने नाग नदीच्या विविध ठिकाणांहून स्वतः गोळा केलेले दूषित पाण्याचे नमुने पर्यावरण मंत्रालयातील अधिकार्यांना सुपूर्द केले तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नावे एक निवेदनही दिले. नाग नदीची वास्तविक स्थिती आणि प्रदूषणाचा स्तर अधिकृत नोंदींमध्ये प्रतिबिंबित होत नसल्याचा मुद्दा काँग्रेसने गंभीरपणे उपस्थित केला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलीकडेच देशभरातील २७१ प्रदूषित नद्यांची यादी जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्रातील ५४ नद्यांचा समावेश आहे. मात्र, नागपूरची नाग नदी या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या मते नाग नदीची स्थिती आज अत्यंत दयनीय असून वाहणारे पाणी अतिशय दुषित आणि आरोग्यास हानिकारक असे आहे. सततची दुर्गंधी, कचरा आणि शहरातील सांडपाण्याचा अनियंत्रित प्रवाह यामुळे नाग नदीचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. अशा परिस्थितीत या नदीला प्रदूषित नद्यांच्या यादीत स्थान न मिळणे यास पर्यावरण विभागाच्या अधिकार्यांची अकार्यक्षमता जवाबदार असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे.
याप्रसंगी विवेक निकोसे, देवेंद्र रोटेले, सुभाष मानमोडे, अभिजीत झा, अभिषेक उसरे, सरस्वती सलामे, मनोज गावंडे, मोनिष चांदेकर, सत्यम सोडगीर, अजय साखळे, दीपक तभाने, रोहित यादव, गोलु मडावी, सुकेशिनी डोंगरे, टिंकू कांबळे, अजय हटेवार, अजय गोडबोले, सचिन कलनाके, सुरेश केदारी आणि इतर काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन विकास ठाकरे म्हणाले की, "नाग नदीला कागदोपत्री स्वच्छ दाखवले जात आहे, परंतु वस्तूस्थिती पूर्णपणे उलट आहे. नागपूरकरांना रोज अनुभवायला मिळणारी दुर्गंधी, घाण आणि सांडपाणी ही खरी वस्तुस्थिती आहे आणि याची दखल केंद्र सरकार आणि पर्यावरण विभागाने घ्यायला हवी. नाग नदी शुद्धीकरणासाठी १,९२७ कोटी रुपयांचा प्रकल्प जाहीर करण्यात आला. परंतु तीन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाग नदीचे काय झाले असा सवाल उपस्थित केला. नाग नदीतून नौका विहार करण्याच्या गडकरींच्या स्वप्नाला केंद्रीय पर्यावरण खात्याने तर कात्री लावली नाही ना, असा सवाल केतन ठाकरे यांनी उपस्थित केला. नाग नदीचे पुनरुज्जीवन हा राजकारणाचा प्रश्न नसून नागपुरकरांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.