

Nagpur Airport 5 crore drug bust
नागपूर: नागपूर विमानतळावर पाच कोटी रुपयांचे पाच किलो ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. बँकॉकमधून हे पाच कोटी रुपयांचे ‘हायड्रोपोनिक’ ड्रग्ज आणले होते. डीआरआय आणि कस्टमच्या विशेष इंटेलिजन्स आणि इंव्हेस्टिगेटिंग शाखेने ही कारवाई केली. दोहा नागपूर विमानातून आलेल्या एका प्रवाशाकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
जप्त केलेले हे ड्रग्ज चरस, गांजा पेक्षाही अधिक प्रभावी आहे. अनेक दिवसानंतर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने या ड्रग्जच्या तस्करीची आंतरराष्ट्रीय साखळी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तीन देश फिरून आल्यावर अडकला जाळ्यात
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. विशेष म्हणजे थायलंड,उझबेकिस्तान आणि सौदी अरब अशा तीन देशातून मोकाटपणे फिरत आल्यावर त्याला नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. आता ही खेप घेण्यासाठी कोण कुठून येणार होते त्याची चौकशी केली जात आहे. यापूर्वी 20 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर विमानतळावर 24 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आले. यानंतरची ही मोठी कारवाई आहे.
'हाय-क्लास ड्रग्ज' मोठी मागणी
डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स व इव्हेस्टिगेटिव्ह ब्रँचने (एसआयआयबी) संयुक्तरीत्या ही कारवाई केली. यावेळी पकडण्यात आलेले ड्रग्ज चरस, गांजा आणि भांगपेक्षाअधिक प्रभावी असून त्याचा मानवी मेंदूवर झपाट्याने परिणाम होतो. 'हाय-क्लास ड्रग्ज' म्हणून या पदार्थाला मोठी मागणी असून या घटकात 'टेट्राहायड्रोकॅनाबिनोल' (टीएचसी) चे प्रमाण साध्या गांजापेक्षा अधिक आहे.मातीऐवजी पाण्यात पोषकतत्त्वे देऊन झाडे वाढविण्याच्या आधुनिक पद्धतीला हायड्रोपोनिक शेती म्हणतात. या तंत्रात उगवलेले 'हायड्रोपोनिक मारिजुआना' साध्या गांजापेक्षा अधिक तीव्र आणि जलद नशा देणारे असते. त्यात टेट्राहायड्रोकॅनाबिनोल (THC) चे प्रमाण जास्त असल्याने मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक आणि व्यसनकारक मानले जाते.