

नागपूर : पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगारी टोळीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क ठेवल्याच्या संशयावरून विदर्भातील अनेक युवक एटीएसच्या रडारवर आले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरात या संदर्भात मोठी कारवाई केली. या कारवाईत विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांतील 10 युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या युवकांचे मोबाइल आणि सोशल मीडिया खात्यांची सखोल चौकशी सुरू असून सकाळपासून विविध ठिकाणी समांतर एटीएसच्या पथकांनी हे धाडसत्र राबविले. अधिकृतपणे कुणीही बोलण्यास तयार नव्हते. प्राथमिक चौकशीत काही युवकांचा पाकिस्तानस्थित गैंगस्टर शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने या नावांशी संबंधित व्यवहार झाल्याचे उघडकीस आले. मात्र, या सोशल मीडिया खात्यांशी संपर्क झालेल्या युवकांचा नेमका सहभाग काय आहे?
ते केवळ ऑनलाइन संपर्कात होते की काही आर्थिक व्यवहार झालेत याची तपासणी आता केली जात आहे. एटीएसने मात्र, या छाप्यांबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. युवकांकडून तपासात जप्त करण्यात आलेले मोबाइल फोन, सोशल मीडिया खाती, चैट हिस्ट्री या तपासातून पुढे येणाऱ्या निष्कषांच्या आधारे पुढील तसेच डिजिटल व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. यानंतर कायदेशीर कारवाईचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियाचा वापर करून देशातील युवकांपर्यंत पोहोचण्याच्या या प्रयत्नांमुळे केंद्रीय आणि राज्य स्तरावरील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संशयास्पद ऑनलाइन संपर्क, परदेशी क्रमांक किंवा अज्ञात खात्याच्या संदेशांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. या प्रकारात सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांशी मैत्री करून त्यांना विविध प्लॅटफॉर्मवरून लिंक पाठवल्या जात होत्या. त्यानंतर संपर्क केला जात होता.
आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. डिजिटल माध्यमातून स्थानिक नेटवर्क तयार करण्याचा उद्देश यातून असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.