ATS raid Marathwada : मराठवाड्यात एटीएसची छापेमारी; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, डोग्रा गॅंगशी कनेक्शनचा संशय

संशयितांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी
ATS raid Marathwada
संभाजीनगर येथील एटीएसच्या कार्यालयात संशयितांना घेऊन जाताना अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गँगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (दि.१०) छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना आणि धाराशिवसह राज्यभरात एकाचवेळी छापेमारी केली. पहाटेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या धाडीत तब्बल मराठवाड्यातून १५ संशयितांना ताब्यात घेत दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.प

दरम्यान, या प्रकरणात एटीएसने गेल्या तीन महिन्यांत केलेली ही दुसरी कारवाई असून, एनआयएच्या पथकानेही वाळूज येथे गेल्या महिन्यात अशीच एक कारवाई केली होती. सोशल मीडियाद्वारे हे संशयित शहजाद भट्टी गॅंगच्या संपर्कात असल्याचा एटीएसला दाट संशय आहे.

ATS raid Marathwada
ATS Raid Marathwada | छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये एटीएसची एकाचवेळी छापेमारी; १४ संशयित ताब्यात

‘एटीएस’कडून संशयितांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान किंवा इतर देशांमधून फंड पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून, तो सध्या दुबईत बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे.

शहजाद भट्टी, त्याचे साथीदार अमजल गुज्जर, अबिट जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्‍ना झिंगाडा, फारूख खोकर, जाफर सुपारी, सनी टायगर, शेख सलमान, सर्फराज डोंगर ऊर्फ जोरासिंग, अबू मुसा, सरकार हे समाजमाध्यमातून काही तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. देशभरातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये भट्टी सामील करत होता. त्यासाठी तो समाजमाध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करत होता. भट्टी आणि त्याच्या साथीदारांशी समाजमाध्यमातून संपर्कात असणाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे.

मोबाईल आणि सीडीआरची सखोल तपासणी

पाकिस्तानी गँगस्टरसोबत या तरुणांचे काही आर्थिक व्यवहार किंवा संभाषण झाले आहे का, हे तपासण्यासाठी एटीएसने या सर्व १५ जणांचे मोबाईल फोन, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी सुरू केली आहे. या कारवाईनंतर एटीएस कार्यालयाबाहेर संशयितांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यापूर्वी मे महिन्यातही एटीएसने १३ संशयितांची चौकशी केली होती.

संभाजीनगरचे सर्वाधिक १० संशयित

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील सर्वाधिक १० संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये वैजापूर (२), मिसारवाडी (३), हर्सूल (१), आरिफ कॉलनी (१), बायजीपुरा (१) व गंगापूर येथील बिहारी कामगार व अन्य भागातील एक यांचा समावेश आहे. तसेच जालना (२), धाराशिव (२) तर बीड येथील एकाला ताब्यात घेण्यात आले होते.

ATS raid Marathwada
Gangster Shahzad Bhatti | पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या नेटवर्कला दणका

गँगस्टर भट्टीचे नेटवर्क दुबईत

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून तो सध्या दुबईत बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे. देशातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरवाद आणि हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा डाव आहे. त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे काही तरुण संपर्कात असल्याचे ‘एटीएस’च्या तपासात उघड झाले. या संशयावरून ‘एटीएस’ने ही धरपकड केली आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून गँगस्टर्सशी संपर्क ठेवणारे, त्यांच्या पोस्टना प्रतिसाद देणारे किंवा समर्थन करणारे अनेकजण आता ‘एटीएस’च्या ‘रडार’वर आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news