नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपराजधानीत लक्षवेधी बॅनरची चढाओढ निवडणूकपूर्वीच वाढली आहे. लाडक्या बहिणींचा लाडका दादा अजितदादा पवार.., शब्दाचा माणूस पक्का, जिव्हाळ्याचा अशा आशयाचे लक्षवेधी बॅनर आज (दि.२२) उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांनी लावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दिक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वर्षावास या पवित्र दिनी भन्तेजी यांना चिवर (भिक्षु संघाचा गणवेश) भेट देवून आणि वृक्षारोपण करण्यात आले. शांती, सद्भभावनेचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जावा. यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. विरोधकांनी मागील निवडणुकीत संविधानाचे कारण सांगून अप्रचार केला.
परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवछत्रपती, शाहू, फुले, आंबेकर यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष असल्याने विरोधकांच्या अप्रचाराला चपराक बसावी. या करीता देशातील पवित्र स्थान दिक्षाभूमी येथून या निमित्ताने सुरवात करण्यात आली. नागपूर शहर व जिल्हा ग्रामीण मध्ये वाढदिवसानिमित्त जन्मविश्वास सप्ताह लाडकी बहिण योजनेचा शिबिर व प्रचार, प्रसार, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, शालेय मुलांना गणवेश वाटप, महिलांना साडी वाटप, चित्रकला स्पर्धा व इतर कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, राज्य ओबीसी समन्वयक ईश्वर बाळबुधे, प्रदेश सचिव अनिल अहिकर, प्रदेश सचिव लक्ष्मी सावरकर, प्रदेश सचिव सुनिता येरणे, माजी नगरसेवक राजेश माटे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, पश्चिम अध्यक्ष समीर रहाटे, मध्य अध्यक्ष रवि पराते, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष संदिप सावरकर, उत्तर अध्यक्ष राकेश बोरिकर, दक्षिण अध्यक्ष अरविंद भाजीपाले, महिला अध्यक्ष जया देशमुख, विद्यार्थी विदर्भ अध्यक्ष माधुरी पालीवाल, विद्यार्थी शहर अध्यक्ष विश्वजीत तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.