

नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे रिकारपेटींग करण्यात आले. त्यासाठी श्रेयवादाचे बरेच राजकारणही झाले. शेवटी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. मात्र ही धावपट्टी सज्ज झाल्यानंतरही आलेल्या उन्हाळी वेळापत्रकात येथून नवीन उड्डाणे सुरू झालेली नसल्याने व्यावसायिक, नागपूरकरांचा भ्रमनिरास झालेला आहे.
31 मार्चपूर्वी धावपट्टीचे काम पूर्ण करा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. फेब्रुवारीपासून उन्हाळी सत्र लागू होणार असल्यामुळे त्याचा लाभ नागपूर विमानतळाला मिळण्याबाबत अपेक्षा होती. एअरलाइन्स कंपन्यांनी नव्या सत्रामध्ये नागपूरहून काही नवीन विमान सेवा सुरू करण्याची घोषणा देखील केली. त्यामध्ये जयपुर, कोल्हापूर विमान सेवांची प्रतीक्षा होती मात्र अद्याप तरी यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार असे दिसत आहे. आता महिन्याच्या अखेरीस दिल्लीमध्ये एआयडीची महत्त्वाची बैठक होत असून त्या बैठकीत विविध एअरलाइन्सच्या माध्यमातून नागपूरवरून देशभरात वेगवेगळ्या दिशेने हवाई सेवा सुरू करण्याबाबत गरज पटवून दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या इंडिगो एअरलाइन्सने पुण्यासाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. आयडी अर्थात असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटने नागपूरवरून नवीन विमान सेवा सुरू व्हावी यासाठी रिकारपेटींगसाठी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. नागरी उड्डयन मंत्र्यांशी पत्रव्यवहार झाला. आशियाई देशांमध्ये विमाने सुरू झाल्यास त्याचा लाभ नागपूरकरांना होईल असा प्रयत्न केला. मात्र अद्याप तरी सिंगापूर, बँकॉक, क्वालालंपूरसाठी थेट विमान सेवा सुरू झालेली नाही. कार्पेटिंग रखडले म्हणून विमानसेवा सुरू होण्यास, हवाई सेवा विस्तारास विलंब होत असल्याचे सांगितले जात असले तरी आता काम पूर्ण झाल्यानंतरही नव्या सेवांसाठी नागपूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार असेच दिसते.