

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून अनेक रस्त्यांवर सुरू असलेला बुलेटस्वारांचा हैदोस कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी धडक मोहिमेत सुमारे 450 सायलेन्सरवर बुलडोझर फिरविला. यासंदर्भात अनेक ज्येष्ठ नागरिक, महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. हो काही रुग्णालयांनीही पोलिसांकडे बुलेटच्या या कर्णकर्कश आवाजाबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करुन फटाके फोडणाऱ्या चालकावर कारवाईचा धडाका सुरु केला. (Nagpur Crime News)
पाच दिवस राबविलेल्या मोहिमेत पाचशेवर सायलेंसर जप्त केले. गुरुवारी संविधान चौकात या जप्त सायलेंसरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आलेत. बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करून रस्त्याने फटाके फोडत जाणे अनेक तरुणांना आवडते. बुलेटच्या फटाक्यामुळे रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या किंवा पायी जाणाऱ्यांच्या हृदयात धडकी भरते. अनेकजण दचकून अपघात होतात ही गंभीर बाब लक्षात घेता वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरातील सर्व दहा परिमंडळात मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. (Nagpur Crime News)
५ ते ९ जानेवारी या पाच दिवसात वाहतूक पोलिसांनी फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई केली. सध्या काही वाहनेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ४४० वाहन चालकांकडून तब्बल ३ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याप्रसंगी सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी, पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, सहायक आयुक्त कल्पना बाविस्कर, पोलीस निरीक्षक आणि अंमलदार उपस्थित होते.
दरम्यान, शोरूममधून बुलेट खरेदी केल्यानंतर काहीजण मेकॅनिककडे जाऊन त्यात आवश्यक ते बदल करून घेतात. अशा गॅरेजमालकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. शहरात एमआयडीसी- ४२, सोनेगाव- ४०, सीताबर्डी- ५२, सदर – ७१, कॉटन मार्केट- ३७, लकडगंज – ३१, अजनी ३६, सक्करदरा- ३९, इंदोरा- ३३ आणि कामठी परिमंडळाअंतर्गत ५९ वाहनांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.