

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : घरगुती क्षुल्लक वादात पतीने डोक्यावर वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजाई नगर परिसरात उघडकीस आली आहे. राखी सुरज पाटील (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पती सुरज पाटील (वय ३५) याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या दोघांना एक मुलगा एक मुलगी आहे. सुरज हा पेंटिंगची कामे करतो. सूरज व राखीत नेहमी वाद होत होते. दोन दिवसापूर्वीच ते इकडे भाड्याने राहण्यास आले होते. मध्यंतरी राखी घरी नसल्याने पतीला संशय बळावला आणि त्यांच्यात मोठा वाद झाला. सूरजने जड वस्तूने राखीच्या डोक्यावर वार केला यात राखी गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झाली त्यानंतर सुरजनेच तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राखीला मृत घोषित केले. यावेळी ती तिसऱ्या मजल्यावरून जमिनीवर खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याचे सूरजने डॉक्टरांना सांगितले मात्र पोलीस तपासात त्याचे बिंग फुटले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.