

Nagpur Achalpur Bar License Bribe
नागपूर : रेस्टॉरंट अँड बारच्या FL3 परवान्यासाठी तब्बल ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अचलपूर येथील दुय्यम निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर पथकाने २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. आकाश दत्ता जाधव (वय ३६), दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अचलपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, ४८ वर्षीय तक्रारदाराने रेस्टॉरंट अँड बारच्या FL3 परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे अचलपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सादर करण्यात आली होती. या कामासाठी १० ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी आकाश जाधव यांनी स्वतःसाठी ३ लाख रुपये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ५ लाख रुपये, असे एकूण ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १२ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने २४ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी तडजोडीनंतर आरोपीने स्वतःसाठी २ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
त्यानंतर पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. अचलपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील आरोपीच्या कक्षात तक्रारदाराकडून २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आकाश जाधव यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध परतवाडा पोलीस ठाणे, अमरावती येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाई एसीबीकडून सुरू आहे.
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक राजकिरण येवले, पोलीस शिपाई प्रफुल भातुलकर, विकेश राऊत, प्रमोद गिरडे आणि विजय सोळंकी यांचा समावेश होता.