

Nagpur Katol Nitesh Gajbhe Murder Case
नागपूर : काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन नगर येथे ३१ मार्च २०२१ रोजी झालेल्या नितेश उर्फ गिरीश गजबे खून प्रकरणाचा निकाल लागला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक दोनचे न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी आरोपी करण गवळी आणि अर्जुन मते या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
३१ मार्च २०२१ रोजी दुपारी सुमारे एक वाजता अर्जुन नगर येथील मारुती कडसाई यांच्या घराजवळ नितेश गजबे याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात नितेशचा जागीच मृत्यू झाला होता. होळीच्या दिवशी आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींनी नितेशच्या घरी जाऊन त्याला चौकात येण्याची धमकी दिल्याचे तपासात समोर आले होते.
घटनेच्या दिवशी आरोपी अर्जुन मते याने नितेशचे मागून दोन्ही हात पकडले, तर करण गवळी याने चाकूने त्याच्या पोटावर वार केला. गंभीर जखमांमुळे नितेशचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृतकाची वहिनी पल्लवी गजबे यांनी काटोल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. काटोल पोलिसांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायालयात दाखल केले. तपास पोलीस निरीक्षक आकाश शाही यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल बाबा नेवारे यांनी सहकार्य केले.
सरकार पक्षातर्फे या खटल्यात एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबांसह वैद्यकीय पुरावे आणि इतर कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींनी नितेशचा खून केल्याचे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या खटल्याची सुरुवात सरकारी वकील राम अनवाणे आणि सहाय्यक सरकारी वकील अर्चना नायर यांनी केली. त्यानंतर संपूर्ण खटला सहाय्यक सरकारी वकील राम अनवाणे यांनी यशस्वीपणे चालविला. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून करण गवळी आणि अर्जुन मते या दोघांना कलम ३०२ भादंविनुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.