

Orange Clean Plant Center
नागपूर : 70 कोटी खर्चाचे संत्र्याचे क्लीन प्लांट सेंटर नागपुरात स्थापन होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज शुक्रवारी केली. एग्रोव्हीजन 2025 या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावर झाले. मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते.
चौहान पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना चांगले रोप मिळाले तरच ते चांगले उत्पादन घेऊ शकतील. मोठ्या नर्सरीला 4 कोटीपर्यन्त अर्थसहाय्य आणि छोट्या तसेच मध्यम नर्सरीला 2 कोटी पर्यन्त अर्थसहाय्य केले जाईल. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांचे जीवनमान सुधारण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. दालमिल उघण्यासाठी सबसिडी दिली जात असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी स्वागतपर भाषण केले. सुरवातीला दीपप्रज्वलन आणि शेतकरी गीत झाले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर शेतकऱ्यांचे आर्थिक विकास केंद्र - गडकरी
स्पेनमध्ये ज्याप्रकारे फार्मर बिजनेस स्कूल आहे, त्याच धर्तीवर अमरावती रोडवरील पीडीकेव्ही मैदानावर ऍग्रो कन्वेंशन सेंटरमध्ये जागतिक दर्जाचे फार्मर बिजनेस स्कूल तयार होत असून, त्याचा लाभ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होईल आणि त्यांचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ शकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. येत्या काही वर्षात एकरी दहा ते बारा टन संत्र्याचे उत्पादन आपल्याकडेही शेतकरी घेऊ शकतील यावर भर दिला. कलमांच्या अधिकृत नर्सरीमध्ये वृद्धी व्हावी अशी विनंती त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांना केली.
बुटीबोरीमध्ये जनावरांच्या चारा प्रकल्पाचे भूमिपूजन: मराठवाडा आणि विदर्भाच्या 19 जिल्ह्यातील शेकऱ्यांकडून 6 लाख लीटर दूध संकलन एनडीडीबी द्वारे केले जाते अशी माहिती एनडीडीबीचे प्रमुख मिनेश शाह यांनी दिली. भारतात सध्या डेयरी उद्योगात परिवर्तन येत आहे. 2016 मध्ये एनडीडीबीने विदर्भ क्षेत्रात कार्य सुरू केले, आज बुटीबोरीमध्ये जनावरांच्या चारा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले तो देखील पुढील वर्षी पर्यन्त कार्यान्वित होईल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,राज्यमंत्री आशिष जयस्वाल, डॉ. पंकज भोयर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, एनडीडीबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिनेश शाह, एसएमएलच्या श्रीमती कोमल या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.