

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षाची शिक्षा झालेले माजी मंत्री व काँग्रेस नेते सुनील केदार यांनी कारागृहातून सुटल्यावर समर्थकांसह विना परवाना रॅली काढली होती. या रॅलीतील ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर केदार आणि समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर इतर वाहनांची आणि समर्थकांची वेगवेगळ्या पथकामार्फत ग्रामीण भागात पोलिस शोध घेत आहेत. Sunil Kedar
समर्थकांनी जामीन घेतला असला तरी केदार यांनी अद्याप अटकपूर्व जामीन घेतलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्यवर्ती कारागृहातून केदार सुटल्यावर विजयी जल्लोष साजरा झाला. विनापरवाना मिरवणूक काढल्याने त्यांच्याविरुद्ध नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. या आधारावर आता पोलिसांकडून शिक्षा वाढ तसेच त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती पुढे आल्याने केदार यांची चिंता वाढणार आहे. Sunil Kedar
माजी मंत्री सुनील केदार यांना नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची मध्यवर्ती कारागृहामधून सुटका करण्यात आली. एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर केदार यांची जेलमधून सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५३ कोटींच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी केदार यांना शिक्षा झाली होती. त्यांच्या सुटकेनंतर समर्थक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांवर धंतोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी केदार यांचा जामीन रद्द होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनील केदार, कुंदाताई राऊत अवंतिका लेकुरवाळे, मनोहर कुंभारे रवींद्र चिखले, अनिल रॉय, विष्णू कोकडे, संजय मेश्राम आदींवर गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा