

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान काढल्याचे पडसाद विधिमंडळात, विधानभवन परिसरातही पहायला मिळाले. निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले असता त्यांना बोलू न दिल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी वॉक आऊट केले. विधानसभेत डॉ. नितीन राऊत यांनी हा मुद्दा मांडला.
सभागृहात आम्ही गृहमंत्र्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्डवर यावे, यासाठी सभापती यांनी वेगळी भूमिका घेतली. गृहमंत्री यांचे विधान हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. महायुती त्यांचा आदर करत नाही का, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो. मग गृहमंत्री यांच्या विधानाचा मुद्दा का उपस्थित होऊ शकत नाही?, असा सवाल करत दानवे यांनी निषेध व्यक्त केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सदस्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना केली आहे. भाजपचा राग यानिमित्ताने बाहेर आल्याचेही ते म्हणाले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला असे पटोले यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.