

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde resigns) यांनी आज मंगळवारी (दि. २६) आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. दरम्यान, नव्या सरकारच्या स्थापनेच्या घडामोडींना (Maharashtra Government Formation) वेग आला आहे. दरम्यान, तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर आज सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. महायुतीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि दिल्लीत जातील आणि त्यानंतर निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला त्यांना मान्य असेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.''
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांनी आज सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवनावर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, राजभवनावरील ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे.
शिवसेनेकडून शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी पुढे करण्यात आली होती. शिंदे समर्थकांकडून त्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शनही सुरु आहे. पण आता शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव निश्चित मानले जात आहे.