

Nagpur Airport Monsoon Update
नागपूर : मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसाचा परिणाम आता नागपूर विमानतळावरील विमान सेवांवरही दिसून येत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे विमान वाहतुकीवर ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) व्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे दोन इंडिगो विमानांच्या आगमनास विलंब झाला असून, एक उड्डाण संचालनात्मक कारणांमुळे रद्द करण्यात आले आहे. याचप्रकारे इतरही उड्डाणे प्रभावित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर , वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. 6E-6058/6145 (मुंबई–नागपूर–मुंबई) या विमानाच्या आगमनास मुंबईतील एटीसीमुळे विलंब झाला. या विमानाचे नियोजित आगमन आज सोमवारी सकाळी 9.30 वाजता अपेक्षित होते. मात्र सुधारित वेळेनुसार हे विमान दोन तास खोळंबले.
मुंबईतील प्रतिकूल हवामानामुळे 6E-2060/5344 (मुंबई–नागपूर–मुंबई) या विमानाच्या आगमनालाही विलंब झाला आहे. या विमानाचे नियोजित आगमन सकाळी 11.40 वाजता होते.
दरम्यान, 6E-6802/5175 (मुंबई–नागपूर–मुंबई) हे उड्डाण संचालनात्मक कारणांमुळे रद्द करण्यात आले आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत असून, संबंधित प्रवाशांनी विमान कंपनीकडून अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.