

नागपूर -अन्य कुणी व्यक्ति मोठी झाली तर मी लहान होईन, तशी काहीना स्वार्थापोटी भीती वाटते. हा मानवी स्वभाव आहे. म्हणून मग भारतावर निर्बंध, टॅरीफ लावण्यात येतात. हे कशाला होते? खरे तर तुम्ही इतक्या दूर साता समुद्राच्या पलीकडे राहता. मग भीतीचे कारण काय ? तर, मी आणि माझ्यामुळे हे घडते, असे काहीजणांना वाटते. असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आज केले.
यानिमित्ताने प्रथमच सरसंघचालकानी अमेरिकेला लक्ष्य केले. मोदी सरकारची पाठराखण केली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नुकतेच 75 व्या वाढदिवसानिमित्त मोहन भागवत यांचे अभिष्टचिंतन केले हे विशेष. वर्धा रोडवरील ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आज शुक्रवारी ते बोलत होते. आपल्या मनात भाव आपलेपणाचा आहे या शब्दात भारताचे धोरण स्पष्ट केले.
आज मी संघप्रमुख आहे म्हणून मला ऐकता, मात्र उद्या कोणी दुसरा असता तर तर परिस्थिती अशीच असती. भारत आज मोठा देश आहे. भारत म्हणतो मोठा देश बनवायचे आहे कारण, सर्व जगाला एक विश्वास,दिलासा द्यायचा आहे. करोडो रुपये कमावणारे झोपेच्या गोळ्या घेतात. संतोष धन आपल्याजवळ आहे, कारण आपल्यात आपलेपण आहे. आपल्यासाठी भारत हा सर्वस्व आहे. आता भारतवासीयांनी मोठं व्हायचे आहे. ही परंपरा आपल्याला लाभली, हे मनुष्य कल्याण राष्ट्र हिताचे काम आहे, सम्पूर्ण जगाला शांती सुंदर बनवणारे हे काम आहे असे सांगत त्यांनी ब्रम्हकुमारीज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच काम करीत असल्याचे सांगितले.