

राजेंद्र उट्टलवार
नागपूर -मध्यंतरी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करणारे आमदार संदीप जोशी यांनी पुन्हा एकदा राजी - नाराजीचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहेत हे विशेष.
मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असताना नागपुरात संदीप जोशी माध्यमात चर्चेत होते. मध्यंतरी त्यांनी काहीशी शांत राहण्याची भूमिका घेतली. आता १३ मे रोजी आमदारकीचा कार्यकाळ संपल्यांनंतर, विश्रांतीसाठी ६ महिने राजकारणातून संन्यास घेणार, त्यानंतर परत राजकारणात फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणार असे माजी महापौर, भाजप आमदार संदीप जोशी यांनी जाहीर केल्याने त्यांच्या भूमिकेची राजकीयदृष्ट्या चर्चा सुरू झाली आहे.
राजकारणाविषयी नाराजी व्यक्त करीत आता मला थांबायचेय..! हे त्यांचे पत्र यापूर्वी चर्चेत आले होते. दोन तीन दिवस कार्यकर्त्यांकडून मनधरणी सुरू होती. अखेरीस त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुढील निर्णय घेतील असे सांगत समर्थकांना शांत केले. आता मात्र आमदारकीची टर्म संपल्यानंतर सहा महिने ब्रेक घेत पुन्हा फिनिक्सप्रमाणे आपण भरारी घेणार असल्याचे माध्यमांजवळ नमूद करताना काहीसे पहिल्या राजकीय संन्यास भूमिकेपासून घूमजाव केले असेही बोलले जात आहे. आता त्यांना नेमकी कुठली जबाबदारी मिळणार हे येणारा काळच सांगणार आहे.