

नागपूर : पुढारी वृत्तसेवा; महायुती सरकारमधील ३९ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा (Maharashtra cabinet expansion) रविवारी राजभवनात पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला गेला. यावेळी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचा कार्यकाळ केवळ अडीच वर्षांचा असेल, अशी घोषणाच अजित पवारांनी केली.
यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. मात्र, ३ वर्षे निवडणुका झाल्या नाहीत, आता अनेक निवडणुका होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लवकरच सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक एक व्यक्ती एकत्र बसणार आहेत. २ महिन्यातच महामंडळावर नियुक्त्या केल्या जातील. मंत्रिमंडळात सर्वच इच्छुकांना संधी देणे अवघड होते. मागच्या सरकारमध्ये काही जणांना दीड वर्षांची संधी मिळाली. आम्ही आता निर्णय घेतला आहे. मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षांसाठी काम करण्याची संधी दिली जाईल.
लोकसभेला आलेल्या अनुभवातून मी माझ्या स्वभावात बदल केला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवलं आता कुणावर चिडायचे नाही. मी स्वभाव बदलला. त्याचा परिणाम दिसून आला. जानेवारीत पक्षाची शिबिरे होणार आहे. कुणीही आपल्याकडून गैरसमज होतील, अशी वक्तव्ये करू नये असेही त्यांनी ठणकावले.
सत्कार सोहळ्यात कुणी मोठा हार अथवा स्मृतिचिन्ह दिले की समजायचे या पठ्ठ्याने काहीतरी चुकीचे काम केले. त्याचा त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. सुनील शेळके सांगत होते. माझे काही खरे नाही. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांना त्याने सुखाने झोपू दिले नाही. त्यांच्या ठिकाणचा प्रकार आणि त्याची तक्रार केंद्रात गेली होती. इंद्रनील नाईक यांच्या विरोधात ययाती नाईक हा त्याचा भाऊ उभा होता. मात्र, तोदेखील निवडून आला. राजू कारेमोरे ६५ हजार मतांनी निवडून आले. काय कळायला नाही काय झाले ते?, असेही अजित पवार म्हणाले.
विदर्भात ७ ठिकाणी उमेदवार उभे केले. मोर्शीतील जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली. तसे झाले नसते तर देवेंद्र भुयार निवडून आले असते. बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणावरही भाष्य करीत राजेंद्र शिंगणे यांचे नाव न घेता त्यांनी चिमटा काढला.
दरम्यान, यावेळी प्रफुल पटेल म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे आपल्याला आजचा हा दिवस साजरा करता येऊ शकला. ही योजना बंद केली जाईल. खात्यात जमा झालेले पैसे बहिणींनी लवकरात लवकर काढून घ्यावे. सरकारी तिजोरी खाली असून सरकार पैसे कुठून देणार? असा भ्रम विरोधक पसरवत होते. पण मी तुम्हाला सांगतो देशात सर्वात जास्त कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर ते अजितदादा आहेत. जे पैसे जिथे पोहोचायचे आहेत तिथे पोहोचवण्याचे काम अजित पवार करतात. पण महाराष्ट्राच्या तिजोरीवर कधीही कोणी नजर ठेवली तर त्याला हात लावू देणार नाहीत. त्यामुळे कोणी काही चिंता करू नका, असेही पटेल म्हणाले.