

नागपूर : मंत्रिमंडळाच्या विस्तारात महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांनी मंत्रिपदे देताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी विविध भागांतील नेत्यांना मंत्रिपद देण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक मंत्रिपदे ही पश्चिम महाराष्ट्र (9) आणि उत्तर महाराष्ट्राला (8) मिळाली आहेत. विदर्भाला 7, कोकणला 5 व मराठवाड्याला 6 मंत्रिपदे देताना मुंबई व ठाणे यासारख्या मोठ्या शहरांसाठी केवळ 4 मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे.
ज्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले नाही, अशा नेत्यांना पक्षीय जबाबदारी दिली जाऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातून निवडून आलेले बहुतांश आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांची संख्या लक्षात घेऊन शिंदे यांना अवघ्या 12 मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. हे करताना त्यांनी प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. 2022 मध्ये शिवसेनेत बंड करताना संजय शिरसाट व भरत गोगावले हे आमदार त्यांच्यासोबत होते. त्यामुळे या दोघांचा सुरुवातीपासून मंत्रिपदावर दावा होता. मात्र, त्यावेळी शिंदे यांना मर्यादा असल्याने या दोघांचाही समावेश शेवटपर्यत होऊ शकला नव्हता.
आता विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याने शिंदे यांनी शिरसाट, गोगावले या दोघांना प्राधान्य देत प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल, योगेश कदम यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन आपल्या गटातील असंतोष काही प्रमाणात शमविण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या जुन्याजाणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नव्या चेहर्यांना संधी देऊन पक्षाचा चेहरा बदलण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यातून पवार यांनी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ या दोघांना संधी देऊन या भागात पक्षांचे बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालवला आहे. शरद पवार गटाचा बालेकिल्ल मानला जाणार्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत अजित पवार यांनी या भागातून हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, मकरंद जाधव-पाटील यांना संधी दिली आहे. संपूर्ण कोकणात अजित पवारांच्या समोर कोणताही पर्याय नसल्याने रायगड जिल्ह्यातून आदिती तटकरे यांचे नेतृत्व पुढे करण्यात आले आहे.
भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आर्थिक रसद तोडण्यासाठी मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत त्यासाठी ठाकरे गटाशी दोनहात करण्याची क्षमता असलेले मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात संधी देऊन दोघांना ताकद दिली आहे. मराठवाड्यातून भाजपने पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. अतुल सावे यांना पुन्हा मंत्रिपद आणि नवीन चेहरा म्हणून मेघना बोर्डीकर यांना संधी देत मराठवाड्याला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर महाराष्ट्र
भाजप - राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे, जयकुमार रावल.
शिंदे गट - गुलाबराव पाटील, दादा भुसे.
अजित पवार गट - माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ.
पश्चिम महाराष्ट्र
भाजप - चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ.
शिंदे गट - प्रकाश आबिटकर, शंभूराज देसाई.
अजित पवार गट - हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, मकरंद जाधव-पाटील.
मुंबई-ठाणे
भाजप - मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, गणेश नाईक.
शिंदे गट - प्रताप सरनाईक.
मराठवाडा
भाजप - पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर.
शिंदे गट - संजय शिरसाट.
अजित पवार गट - धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील.
विदर्भ
भाजप - चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके, आकाश पुंडकर, पंकज भोयर.
शिंदे गट - संजय राठोड, आशिष जैस्वाल.
अजित पवार गट - इंद्रनील नाईक.
कोकण
भाजप - नितेश राणे.
शिंदे गट - उदय सामंत, भरतशेठ गोगावले, योगेश कदम.
अजित पवार गट - आदिती तटकरे.