नागपुरात भर पावसातही मारबत उत्सवाचा जल्लोष

मारबत उत्सव
मारबत उत्सव

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आज पाडवा अर्थात तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत उत्सव साजरा केला जातो. देशातीलच नव्हे तर जगातील नागपूर एकमात्र असे शहर आहे जिथे ही सांस्कृतिक, सामाजिक परंपरा मागील १४० वर्षांपासून जोपासली जाते. स्वातंत्र्यापूर्वी, ब्रिटिशकाळात १८४० बाकाबाई भोसले यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्याच्या निषेधार्थ सुरू झालेली काळी मारबत आजही वाईट चालीरीती, कुप्रथा, देशविघातक शक्ती नष्ट व्हाव्यात म्हणून त्याच उत्साहात निघते.

तर पुतना मावशीचा वध श्रीकृष्णाने केला त्यानंतर तिचे दहन गावकऱ्यांनी केले त्याचेच प्रतीक म्हणून १८४५ साली तऱ्हाने तेली समाजातर्फे जागनाथ बुधवारी येथून पिवळी मारबत उत्सव सुरू झाला. लहान मुलांसह लोक या मारबतच्या पाया पडतात, काही दिवस उत्सव चालतो, अनेक सेलिब्रिटी येतात. या दोन्ही मारबतींचे नेहरू पुतळा चौकात पारंपरिक मिलन होते. व पुढे मिरवणूक मार्गस्थ होते. आज सकाळी ११ वाजता या मारबत उत्सवाला सुरुवात झाली.

प्रथेनुसार नागपुरातील इतवारी नेहरू पुतळ्याजवळ काळी आणि पिवळी ह्या दोन्ही मारबत भेटल्या. यावेळी सर्दी, खोकला, रोगराई, गद्दारी घेऊन जा गे…मारबत अशी आरोळी ठोकत, जल्लोषात काळी मारबत, पिवळी मारबत समोरासमोर वाकून नमस्कार केल्यानंतर या मारबत उत्सवाची मिरवणूक शहरात फिरते. गेल्या काही वर्षात तरुण मित्रमंडळामार्फत मारबतसोबत अनेक बडगेही काढले जातात. यात महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार असे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी चर्चेचा विषय घेऊन बडगे तयार केले जातात.

यावेळी सनातन धर्मविरोधी स्टॅलिनचा बडगा काढला गेला. हे मारबत आणि बडगे पाहायला मोठ्या संख्येने नागपूरकरांनी गर्दी केली असून या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बँड व डीजेवर लोक थिरकत असतात. काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असूनही आज पाडव्याच्या दिवशी नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसले. मात्र, कागदापासून तयार केलेल्या या प्रतिकृती वाचवण्यासाठी आयोजक, मंडळाच्या कार्यकर्त्यांची मात्र दमछाक होत होती. इतवारी, महाल, मस्कासाथ परिसरात वाहतूक वळविण्यात आली. यानिमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news