

Maharashtra law and order issue
नागपूर : मालेगाव येथे आज संतप्त जमाव कोर्टात शिरला. हा जनतेचा उद्रेक आहे. आज हा उद्रेक गुन्हेगाराविरोधात आहे, उद्या हा उद्रेक सरकार विरोधात असेल! असा संताप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा दरारा होता. आता गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही. गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. आपल्याला न्याय मिळणार नाही अशी भावना लोकांची होत असल्याने कोर्टात जमाव घुसला. यातून आता तरी पोलिस खाते आणि सरकारने सुधारले पाहिजे.
आमचे सरकार असताना आम्ही अशा प्रकरणासाठी शक्ती कायदा आणला होता. तो अंमलात आणला जात नाही, पोस्को कायद्याची अंमलबजावणी होत नाही. मालेगाव प्रकरणात एक महिन्यात फास्टट्रॅकवर केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, मालेगाव तालुक्यातील एका गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळळी असून, आरोपीला गावातच फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मालेगाव-कुसुंबा महामार्ग रोखून धरला.
गावातच काही अंतरावर असलेल्या एका टॉवरच्या बाजूला चिमुकलीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. यामुळे तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अत्याचार करून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत रात्रीतून फरार आरोपी विजय यास अटक केली. त्याच्या प्राथमिक चौकशीत हा सगळा प्रकार समोर आला.