

मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील एका गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळळी असून, आरोपीला गावातच फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मालेगाव-कुसुंबा महामार्ग रोखून धरला.
दाखल फिर्यादीनुसार मालेगाव तालुक्यातील एका गावात बालिका रविवारी सायंकाळच्या सुमारास काही बालकांसमवेत अंगणात खेळत असताना संशयित विजय संजय खैरनार (24) याने अन्य बालकांना चॉकलेट देत या चिमुकलीला चॉकलेट देण्याचे आमिष देऊन घरी नेले. मात्र, घरासमोर खेळत असलेली बालिका दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही. याबाबत इतर बालकांकडे चौकशी केली असता त्यांनी चिमुकलीला संशयित विजय घेऊन गेल्याचे सांगितले. मात्र, शोध घेऊनही विजय व बालिका आढळून आली नाही. त्यानंतर गावातच काही अंतरावर असलेल्या एका टॉवरच्या बाजूला चिमुकलीचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यामुळे तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अत्याचार करून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत रात्रीतून फरार आरोपी विजय यास अटक केली. त्याच्या प्राथमिक चौकशीत हा सगळा प्रकार समोर आला.
दरम्यान, या प्रकरणी मंत्री दादा भुसे, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, सहायक पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, दर्गन दुग्गड, उपअधीक्षक बाविस्कर, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर, सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी आदींनी गावात येऊन पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तालुक्याला हादरवून सोडणार्या या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संशयिताला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
संशयितास 20 पर्यंत पोलिस कोठडी
संशयित आरोपीला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच मालेगाव वकील संघाने संशयिताचे आरोपपत्र घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.
मृतदेह पाहून संपूर्ण गाव सुन्न
अंगणात खेळणारी बालिका काही क्षणात नाहीसी होऊन थेट तिचा दगडाने ठेचलेला मृतदेह पाहून तिचे कुटुंबीयांसह संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. अंगणात खेळणार्या मुलीवर असा काही प्रसंग ओढवेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.
ग्रामस्थांनी महामार्ग रोखला
नराधमास तत्काळ फशी द्यावी या मागणीसाठी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी केली. तसेच आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध केला.
घटना अत्यंत संवेदनशील असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार आहे. या केससाठी वरिष्ठ विधीज्ञ उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहे. या घटनेचा तीव निषेध करतो.
दादा भुसे, शिक्षणमंत्री
बालिकेवरील अत्याचार व खुनाच्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे. उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी या प्रकरणी चौकशी करेल. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वंकष पुरावे जमा करण्यात येत आहे. कुठलेही कच्चे दुवे राहणार नाहीत याची काळजी घेत आहोत. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. जनभावना तीव्र असल्याची आम्हाला जाणीव आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत सर्व कायदेशिर बाबींची पूर्तता करू.
बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण