

नागपूर: भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपच्या ताब्यात आहेत. सहयोगी पक्षांची अवस्था ‘‘भीगी बिल्ली’’सारखी भाजपने करून ठेवली आहे. मुंबईचा महापौर बसवायचा हा वरून आलेला आदेश आहे. आर्थिक राजधानी मुंबई सोडणे त्यांना परवडणार नाही असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला
पूर्वी कृषीप्रधान राज्य म्हणत होतो, आता हे ‘‘गुंडांचे राज्य’’ झाले आहे. लाडके ठेकेदार झाले आहेत. टेंडर न देता कामे वाटली जात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये एका मतासाठी ५० हजार रुपये वाटले गेले. हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान, मंदिर-मशीद एवढ्याच विषयांवर भाजप राजकारण करतो असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
जर चेतक घोड्याची आई गुजराती असू शकते, तर हापूस आंबा गुजराती असू शकत नाही असे कसे? मुंबई उद्या गुजरातची होईल, ही त्याची सुरुवात आहे. हळूहळू फळावरून गडावर जाणारा हा प्रवास आहे आणि उद्या गडही गुजरातचा होता असे सांगितले जाईल. ते आता ‘राजे’ आहेत, काहीही बोलू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्य गुजरातने दिले, वैभव गुजरातचे आहे आणि आपण जगतो तेही गुजरातमुळेच असे टीकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडले.
हिवाळी अधिवेशनात विषय मोठे आहेत. मागच्या अधिवेशनापासून आजपर्यंत विदर्भात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. वाघांचे हल्ले रोज होत आहेत ‘‘जंगल शाप की वरदान’’ म्हणण्याची वेळ आली आहे. सरकार काय करत आहे? नागपूर आणि मुंबई ड्रग्जचे हब झाले आहेत. विदर्भातून नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात पलायन सुरू आहे. विदर्भात सत्ता असूनही तरुणांच्या रोजगाराचे काय झाले? कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. घोटाळे वाढले आहेत. सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही. पाच दिवसांच्या कामकाजाची अपेक्षा आहे. आता उत्तर देणारे सरकार उरलेले नाही, तरी आम्ही प्रश्न मांडू आणि जनतेपर्यंत पोहोचवू.
इंदू मिल स्मारकाबाबत बोलताना २०१४ मध्ये घोषणा झाली, फार छाती ठोकली गेली. पण आज ते कुठे आहे? किती काम झाले? किती पैसे दिले? खर्च होत आहेत का? दोन वर्षांत काम पूर्ण करता आले असते, मग दहा वर्षे वाढवण्याची गरज का पडली? भाजपमध्ये ‘‘सगळे हिरो’’ सामील झाले, त्यामुळे हिरोगिरी सुरू आहे. यामुळे बलात्कार, अत्याचार करून पळून जाण्याची हिंमत वाढली आहे. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे गेला आहे. हे एका वर्षापूर्वीही होतं का? सध्या ‘‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.