

नागपूर : उद्या काय होणार हे सांगता येत नाही मात्र योग्यवेळी प्रस्तावावर निर्णय घेऊ असे स्पष्ट करतानाच विरोधी पक्षनेतेपदाचा गुंता लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत असे संकेत आज (दि.७ डिसेंबर) विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले.
वारंवार दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधूनही त्यांनी हा विषय योग्य वेळीच सुटेल असेच उत्तर दिले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या सुविधांचा आढावा बैठकीनंतर ते मंत्री परिषद सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते पदासंबंधीचा प्रस्ताव आलेला आहे पण तो प्रलंबित असून योग्य वेळी योग्य निर्णय होईल. मुळात1947 साली जे होते ते आता 2025 मध्ये सुरू असणे अभिप्रेत नाही. अध्यक्षांचा तो अधिकार असून काळाच्या ओघात काही बदल होतात असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधक पत्रकार परिषदेतच संतापले.
काँग्रेसकडे ती सभ्यता होती भाजपकडे ती नाही. संख्याबळ नसताना यापूर्वी काँग्रेसने भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिले आहे यावर विरोधकांनी भर दिला. विदर्भाच्या प्रश्नांना दोन्ही बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न करू, मात्र दोन्ही बाजूने अनुकूल वातावरण असावे. कुणाल कामरा प्रकरणी हक्कभंग स्वीकारला आहे. सध्या समिती कामकाज करीत असून नंतर ते पीठासीन अधिकाऱ्याकडे येईल असेही राम शिंदे यांनी सांगितले.
नागपूरचे अधिवेशन होणार नाही यात कुठलेही तथ्य नाही. जोपर्यंत आपण संयुक्त महाराष्ट्रात आहोत तोवर हे अधिवेशन होणारच, पुढील अधिवेशन कुठे होणार हे योग्यवेळी सांगितले जाईल. नागपुरातील अधिवेशन होणार नाही हा अपप्रचार आहे असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.