Maharashtra Police Vacancies | महाराष्ट्र पोलीस दलात २३,३२० पदे रिक्त; कायदा-सुव्यवस्थेसमोर मनुष्यबळाचे मोठे आव्हान

आरटीआयमधून धक्कादायक माहिती उघड; पोलीस शिपाईंची १६,५१६ तर उपनिरीक्षकांची २,८७८ पदे रिक्त, संयुक्त राष्ट्रांच्या निकषानुसार पदसंख्या वाढविण्याची मागणी
Police
PolicePudhari
Published on
Updated on

Maharashtra Law And Order Challenge

नागपूर : राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ३० जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पोलीस दलातील मंजूर २ लाख २५ हजार ४६१ पदांपैकी तब्बल २३ हजार ३२० पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गात असून, वाढत्या लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

राज्यातील पोलीस दलातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती 'असोसिएशन ऑफ सोशल अँड आरटीआय अॅक्टिव्हिस्ट्स' (आसरा) संस्थेचे अध्यक्ष संजय थुल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली होती. त्यावर महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक सतीश जाधव यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली.

Police
Rahul Gandhi: CJP आंदोलन सोडून राहुल गांधी अचानक PM निवासस्थानी का गेले? यामागचं राजकारण काय होतं?

माहितीनुसार, ३० जून २०२६ रोजी राज्यात पोलीस दलातील एकूण २ लाख २५ हजार ४६१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ लाख २ हजार १४१ पदांवर कर्मचारी कार्यरत असून २३ हजार ३२० पदे अद्याप रिक्त आहेत.

रिक्त पदांमध्ये सर्वाधिक संख्या पोलीस शिपाई संवर्गाची आहे. या संवर्गातील १ लाख २६ हजार ७०९ मंजूर पदांपैकी १ लाख १० हजार १९३ पदे भरलेली असून १६ हजार ५१६ पदे रिक्त आहेत. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गात ११ हजार ८८४ मंजूर पदांपैकी केवळ ९ हजार ६ पदे भरलेली असून २ हजार ८७८ पदे रिक्त आहेत.

सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) संवर्गात २० हजार ११९ मंजूर पदांपैकी १८ हजार ५५७ पदे भरलेली असून १ हजार ५६२ पदे रिक्त आहेत. सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) संवर्गातील ४ हजार ७७९ मंजूर पदांपैकी ४ हजार ४९२ पदे भरलेली असून २८७ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक संवर्गात ४ हजार २५३ मंजूर पदांपैकी ३ हजार ७३२ अधिकारी कार्यरत असून ५२१ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Police
CJP Jantar Mantar Protest: २० जुलै तर ट्रेलर... सरकारनं ऐकलं नाही तर 'शांत' बसणार नाही; CJP प्रवक्ता रांका यांनी दिला इशारा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावरही रिक्त पदांची संख्या लक्षणीय आहे. पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक या संवर्गातील ४५४ मंजूर पदांपैकी ४२४ पदे भरलेली असून ३० पदे रिक्त आहेत. तर पोलीस उपअधीक्षक संवर्गातील ९७२ मंजूर पदांपैकी ७८७ पदे कार्यरत असून १८५ पदे रिक्त आहेत.

हवालदार संवर्गात मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी

माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीत पोलीस हवालदार संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर पदांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. याबाबत २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक पदाचा पोलीस हवालदार संवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हवालदार आणि नाईक या दोन्ही संवर्गांतील एकूण ६१ हजार ७० मंजूर पदांच्या तुलनेत ६२ हजार ९५० कर्मचारी कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

'आसरा' संस्थेचे अध्यक्ष संजय थुल यांनी राज्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, गुन्हेगारीचे बदलते स्वरूप आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेता २३ हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या निकषानुसार प्रति एक लाख लोकसंख्येमागे २२२ पोलिसांचे प्रमाण गाठण्यासाठी राज्यातील मंजूर पदसंख्या वाढविण्याची गरज असून, याबाबत शासनाकडे निवेदन सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Police
Rahul Gandhi press conference : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह ३ प्रमुख मागण्या मान्‍य झाल्‍याच पाहिजेत : राहुल गांधी

ठळक आकडेवारी

मंजूर पदे : २,२५,४६१

कार्यरत कर्मचारी : २,०२,१४१

रिक्त पदे : २३,३२०

पोलीस शिपाई रिक्त : १६,५१६

पोलीस उपनिरीक्षक रिक्त : २,८७८

सहायक पोलीस उपनिरीक्षक रिक्त : १,५६२

पोलीस निरीक्षक रिक्त : ५२१

सहायक पोलीस निरीक्षक रिक्त : २८७

पोलीस उपअधीक्षक रिक्त : १८५

पोलीस अधीक्षक ते महासंचालक रिक्त : ३०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news