

नागपूर : राज्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्ते मोकळे करून ते बारमाही करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
पाणंद रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेत शेतरस्त्यांची मोजणी करणे, रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे आणि रस्ते वादमुक्त करणे, ही जबाबदारी महसूल विभागाला देण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत राज्यातील सर्व शेतरस्ते बारमाही करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी, दिवसाला १२ तास वीज आणि चांगला रस्ता पोहोचला, तर शेतकऱ्यांचा मुलगा सरकारी नोकरीसाठी भटकणार नाही,”असे सांगत बावनकुळे यांनी शेतरस्त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेत सरकारच्या योजनांचा लाभ रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला. ५० शेतकऱ्यांची वाहतूक अडविणारे अतिक्रमण करणाऱ्यांचे ॲग्रो स्टार्ट नंबर बंद करण्यात येतील. पुढील पाच वर्षे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते या मोहिमेत समाविष्ट करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर बंदी आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, संजय गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर विधिमंडळात प्रश्न आल्यानंतर सभागृहात योग्य उत्तर दिले जाईल.
देवस्थान इनाम जमिनी
देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात काही गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, सरकारचा उद्देश देवस्थानांना मजबूत करणारा कायदा आणण्याचा आहे. हा कायदा सध्या सार्वजनिक चर्चेसाठी ठेवण्यात आला असून, जनतेच्या व देवस्थानांच्या सूचनांचा विचार करून आवश्यक बदल केले जातील. राज्यात कोणताही देवस्थानविरोधी कायदा येणार नाही. देवस्थानांचे हक्क अबाधित ठेवूनच कायदा लागू केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पाच तारखेला राज्यस्तरीय समिती स्थापन करून संबंधित पदाधिकारी आणि देवस्थान प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
एकनाथ शिंदे हे NDA मधील महत्त्वाचे नेते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे एनडीए मधील महत्त्वाचे नेते आहेत. राज्याच्या विकासासाठी विविध खात्यांच्या प्रस्तावांसंदर्भात ते दिल्लीला जात असतात. त्यामुळे या दौऱ्याचे राजकारण नको.
प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे
मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी शिकवणी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आली पाहिजे. हिंदी, मातृभाषासोबत मराठी शिकण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे. मराठी शिकवणी सुरू होत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींनी २०४७ पर्यंत वाट पाहावी
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, देशातील जनतेने विकसित भारतासाठी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी यांनी 2047 पर्यंत वाट पाहावी. त्यांनी विदेश दौरे करून स्वतःला अधिक सक्षम करावे, तोपर्यंत सत्तेचा विचार करू नये असेही बावनकुळे म्हणाले.