

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण अनुषंगाने ज्या ज्या बाबी होत्या. त्याचे उत्तर आम्ही दिलेले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकरच लागेल. येणाऱ्या काळात निकाल आल्यावर राज्य निवडणूक आयोग एप्रिल, मे पर्यंत या निवडणुका लावेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलून दाखविला. शेवटी ही जनतेची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्यच नसल्याने विकासाला बाधा येते. साधारणत: एप्रिल मे महिन्यापर्यंत तातडीने निवडणुका व्हायला पाहिजेत, अशी जनतेची अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे राजीनामा संदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ते सोडवतील. सुरेश धस यांची मुंडे भेट संदर्भात वारंवार प्रश्न विचारून राजकारण करू नका, यावर कालच सविस्तर बोललो. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपचा हात असल्याच्या आरोपावर बोलताना हा काय वेडेपणा आहे. संतोष देशमुखाच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी म्हणून पूर्ण प्रयत्न, चौकशी सुरू आहे. उगीच कुणी भडकवण्याचे काम करू नये.
देशमुख हत्या ही गंभीर आहे. याकडे राजकारण म्हणून बघू नये. सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी, यावर भर दिला. दुसरीकडे, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल बोलताना जाधव यांच्या राजकीय आयुष्याबद्दल प्रश्नचिन्ह लावू नका? त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नाही, असे स्पष्ट केले.