

Leopard Dies In Saoner
नागपूर: सावनेर तालुक्यातील पिपळा भदी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन विभाग व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे.
केळवद पोलीस ठाणे हद्दीतील पिपळा भदी परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली. त्यांनी तत्काळ ही माहिती सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) सागर खर्डे यांना दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी विजय गंगावणे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर केळवद पोलीस ठाण्याचे अधिकारी सूरज परमार यांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वन विभागाने मृत बिबट्याचा ताबा घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.