

नागपूर : नवीन काटोल नाका समोरील टोल नाका परिसरात दुहेरी अपघातात चौघे जखमी झाले होते. यातील तिघांचा प्रकृती चिंताजनक होती. या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.४) पावणेतीनच्या सुमारास झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक शेख रफिक याला अटक केली आहे. टेम्पो चालक रोशन कडूजी टेकाम, रमेश देहनकर आणि मसराम (अडनाव समजू शकले नाही) अशी मृतांची नावे आहेत.
नागपूरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या टेम्पोची ओव्हरटेक करण्याच्या नादात मोपेडला धडक बसली. यावेळी मोपेडचालकाला वाचवित असताना टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणाऱ्या ट्रकची व टेम्पोची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पोचा चक्काचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक रोशन कडूजी टेकाम, रमेश देहनकर, मसराम हे तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोपेड चालक माणिक महादेवराव बंधराम हे जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.