

नागपूर : काँग्रेसने 'जय हिंद' यात्रा काढली. आमची काहीही हरकत नाही. फक्त ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, येवढीच आमची अपेक्षा आहे. कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागले आहेत. त्यातून सैन्याबद्दल त्यांचा अविश्वास दिसत आहे, असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१८) केला. नागपुरात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, एकीकडे ते सेनेवर अविश्वास दाखवतात अन् दुसरीकडे जय हिंद यात्रा काढतात. खरेतर त्यांना जय हिंद तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तुम्ही सेनेच्या पाठीशी विश्वास दाखवाल, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला. स्वतःच्या देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वाधिक अद्ययावत शस्त्रास्त्र भारताकडे आहेत हे जगाला कळून चुकले आहे. तुर्कीसारखा देश दहशतवादाला पाठींबा देतो, हा मानवतेच्या विरोधात मोठा गुन्हा आहे. आता त्यांच्या विरोधात भारताने त्यांच्यासोबत व्यवहार करण्यास नकार दिला आहे. देशवासीयांच्या या भूमिकेचे मी स्वागत करतो.
ऑपरेशन सिंदूरचे यश आपण पाहिले. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियामुळे आपण हे करू शकलो. जेव्हा पंतप्रधान २०१४ मध्ये मेक इन इंडियाचा नारा द्यायचे, तेव्हा लोक त्याला जुमला म्हणत होते. मात्र आता इतर देश आपल्याकडे शस्त्रास्त्रांची मागणी करत आहेत. हा पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तानपेक्षा चार-पाच पट जास्त आहे. आपली सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा नंबर लागतो. शेवटी पाकिस्तानने गुडघे टेकवल्यावरच भारताने युद्धविराम केल्याचेही फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले.