

नागपूर - प्रायोगिक नाटक महत्वाचे असून ती एक प्रयोगशाळा आहे. रंगभूमीवरचे सारे संशोधन प्रायोगिक नाटकांमध्येच होते. त्यामुळे प्रायोगिक नाटक टिकले पाहिजे, असे विचार 100 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
‘हौशी रंगभूमीची दशा आणि दिशा’ या विषयावर रंगचर्चा अध्यक्षस्थानी डॉ. जब्बार पटेल होते. कोकणचे कलावंत केदार सामंत, मुंबईचे रंगकर्मी व लेखक अरुण कदम, पुण्याचे मनोज डाळींबकर, चंद्रपूरचे नट व निर्माते अजय धवने, नांदेडचे देवेश कावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी यात सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन सलीम शेख यांनी केले.
केदार सामंत यांनी ग्रामीण रंगभूमीवर विचार व्यक्त करताना चांगल्या संहितांची कमतरता, साधनांचा अभाव, महिला कलाकारांची अनुपलब्धता अशा अनेक समस्यांचा सामना करत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नाटके सादर केली जात असून जातात, असे सांगितले. अरुण कदम यांनी हौशी प्रायोगिक रंगभूमीवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयावर आपले विचार व्यक्त केले. ‘हौशी रंगभूमीची दशा’ या विषयावर मनोज डाळींबकर यांनी विचार व्यक्त करताना लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेवर प्रकाश टाकला. हौशी रंगभूमी आणि शासकीय धोरण या विषयावर बोलताना अजय धवने यांनी कलाकारांना सांस्कृतिक संचालनालयाद्वारे हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. सतीश लोटके यांनी नाट्य परिषदेची बाजू मांडली.