

नागपूर- महाराष्ट्र सरकारने लिलावात सर्वाधिक 45. 17 लाख रुपयांची बोली लावत एका मध्यस्थामार्फत घेतलेली ही श्रीमंत राजे रघोजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लवकरच नागपुरात यावी, आपल्या संग्रही असावी असाच भोसले घराण्याचा प्रयत्न असणार आहे.
आमच्याकडूनही 35 लाख रुपयांपर्यंत बोली लागली. भविष्यात सिनियर भोसला पॅलेस येथे होऊ घातलेल्या सुसज्ज भोसलेकालीन तोफा, शस्त्र अशा दुर्मिळ, वस्तूच्या संग्रहालयात ही तलवार, हा ऐतिहासिक ठेवा बघायला मिळावा असा आमचा प्रयत्न असेल अशी माहिती यानिमित्ताने भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले यांनी बोलून दाखविला. अर्थातच राज्य सरकार ती नागपुरातील अजब बंगला, मध्यवर्ती संग्रहालय किंवा इतर संग्रहालयात ठेवणार की, भोसले कुटुंबियांना सोपविणार हे लवकरच उघड होणार आहे. यासाठी राजे मुधोजी भोसले लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची देखील आभार मानण्यासाठी आणि ही विनंती करण्यासाठी भेट घेणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.