

Senior Bhosale Palace Nagpur
नागपूर: नागपूरचे राज्य संस्थापक, हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) यांची ऐतिहासिक तलवार अखेर लंडन येथील लिलावातून राज्य सरकारच्या पुढाकाराने परत महाराष्ट्रात, नागपुरात येण्याचा मार्ग मोकळा झाला. आज (दि.३०) याविषयीचा आनंद श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी व्यक्त केला. आज भोसले यांच्या महाल येथील राजवाड्यात श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या प्रतिमेचे व रघुजी महाराजांच्या तलवारीच्या चित्रांचे सिनीयर भोसला पॅलेसला विधिवत पूजन करण्यात आले.
राजे मुधोजी भोसले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आदी मान्यवरांना आपण पत्राद्वारे विनंती केली त्याचा लगेच परिणाम झाला. दि 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 01.50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तलवार महाराष्ट्रात आणली जाईल याबद्दलची शाश्वती दिली. शासनाने पुढाकार घेतला तरी माझ्या वतीने शासनाच्या मदतीला व्यक्तिगत अशोकसिंग ठाकूर यांचे भाचे विदेशातून नॉटीगन येथून अकुंर सिंग व कोल्हापूरचे इंद्रजीत सावंत यांच्या वतीने मंदार कदम यांनी या लिलावात भाग घेतला.
परंतु, शेवटी अंतराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र शासनाने बाजी मारली. आता लवकरच ही तलवार परत येणार आहे. या ऐतिहासिक कार्यासाठी सर्वांचे नागपूर भोसले राजघराण्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आभार मानतो, असेही यावेळी मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केले.