

नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची महिलेने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केली. ही घटना गुरूवारी (दि.१५) जिल्ह्यातील नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोना येथे घडली. शिवशंकर (वय ३४, संपूर्ण नाव माहीत नाही) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीसह तिचा प्रियकर शांताराम पुरणसिंग दिदावत (रा. बेलोना) याला अटक करण्यात आली आहे.
शिवशंकर हे पत्नी व दोन मुलांसह कामाच्या शोधात नरखेड तालुक्यातील बेलोना येथे गतवर्षी आले. एका शेतकऱ्याकडे शांताराम हा दिवाणजी होता, यातून दोघांची ओळख झाली. त्यानंतर शांतारामचे शिवशंकरच्या घरी येणे- जाणे सुरू झाल्याने त्याचे व शिवशंकरच्या पत्नीचे सुत जुळले. त्यांच्या या अनैतिक संबंधाला शिवशंकर अडसर ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. प्राथमिक माहितीवरून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनीही हत्येची कबुली दिली. दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणेदार अजित कदम यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.