मुंबई : सामान ठेवण्यावरून झालेल्या वादातून रंजना संघानी या 72 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच शेजारच्या व्यक्तीने चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून अशोक केसवाणी या 65 वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे. त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी कांदिवलीतील एस. व्ही. रोडवरील बसंती भुवन या इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये रंजना आणि अशोक हे दोघेही शेजारी राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी रंजनाने तिचे काही सामान बाहेर ठेवले होते. त्याला अशोकने विरोध करून ते सामान घरात ठेवण्यास सांगितले, मात्र तिने सामान घरी ठेवण्यास नकार दिला होता. याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता.
या वादानंतर रागाच्या भरात अशोक हा घरी गेला आणि त्याने घरातील चाकूने रंजनावर पाच ते सहा वार केले होते.त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच कांदिवली पोलिसांनी जखमी झालेल्या रंजनाला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अशोक केशवाणी याला पोलिसांनी अटक केली. अशोक त्याच्या दिव्यांग बहिणीसोबत राहात असून क्षुल्लक कारणावरून होणार्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.