

Tiger Attack News
नागपूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीबाबत उत्सुकता आहे. वनमंत्री गणेश नाईक यांना विदर्भात येताच विमानतळावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, ''राजकारणावर मला बोलायचं नाही', वाघ महत्वाचा आहे असे उत्तर त्यांनी दिले.
एकंदरीत राजकारणावर बोलण्याचे टाळले पण वनविभागाबद्दल वनमंत्री नाईक यांनी भरभरून माहिती दिली. ते म्हणाले, नवे तंत्रज्ञान इक्युपमेंट लावले जातील. यामध्ये वन्यप्राणी आल्याचा फोटो, व्हिडिओ ती यंत्रणा घेईल आणि सायरन वाजवून अलर्ट देईल. सायंकाळी साडेसात ते सकाळी साडेसात ही वेळ फार महत्वाची असते. त्यासाठी लोकांमध्ये जागृती केली जाईल. सोलर फेन्सींग लावण्यासह अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
विदर्भात मानव - वन्यजीव संघर्ष वाढला असून लोकांचे बळी जात आहेत. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आज गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे वाघाच्या हल्ल्यात एक मृत्यू झाला. त्या ठिकाणी अधिकारी सातत्याने काम करत होते. पण समाजात वनविभागाविषयी गैरसमज पसरवले जात आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या गावांतील रस्त्यांवर वाघ येत असतात. त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात आम्ही मायक्रो लेव्हलवर बदल करतोय. निश्चितपणे चांगले बदल होतील आणि मानव - वन्यजीव संघर्ष कमी होईल. यासाठी आम्हाला माध्यमांचीही मदत लागणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.