

चंद्रपूर : नागपुरात वाघांचे झालेले मृत्यू ही देशातली पहिली घटना असून ही चिंताजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. संरक्षित वनाबाहेरील वन्यप्राण्यांच्या नियंत्रणासाठी ताडोबात विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
ते पुढे म्हणाले, याबाबत प्रयोगशाळेमध्ये नमुन्यांची तपासणी करून वाघांच्या मत्यूचे कारण शोधले जाईल. या प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कुठलाही त्रास झालेला नाही, त्यामुळे यावर पुढील काही दिवसात अधिक भाष्य करणे सोईचे होईल.
टायगर पॉर्क मध्ये पैसे भरून कॅमेरे नेता येत असतील तर मग मोबाईल कॅमेऱ्यावर बंदी का असा प्रश्न मीच अधिकाऱ्यांना विचारला आहे, मात्र अधिकाऱ्यांनी युट्युबर कडून अशा प्रकारचे वाघांचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी प्रकार केले जातात असं सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने मी अजूनही समाधानी नाही, अधिकारांसोबत जबाबदारीचे देखील भान ठेवायला हवं त्यामुळे पर्यटकांना जागृत करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले. असे ते म्हणाले.
वाघ आणि इतर वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासात शिकार मिळाली नाही तर ते बाहेर येतात, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, त्याचा अभ्यास करून आपल्या राज्यात देखील त्या लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले. व्याघ्र प्रकल्पामध्ये जिप्सी नियमांचे उल्लंघन केल्या जातात. जिप्सीने पर्यटकांना व्याघ्र दर्शन घडवण्यासाठी नियमावली आहे आणि अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.