

राजेंद्र उट्टलवार, नागपूर
काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, काँग्रेसला काँग्रेसच पराभूत करू शकते, या उक्तीचा पुन्हा एकदा चंद्रपूरमध्ये प्रत्यय येत आहे. कधीकाळी विदर्भ हा काँग्रेसचा अभेद्य गड होता. आज या गडावर भाजपचा झेंडा उंचावत आहे. एकीकडे पश्चिम विदर्भातील अकोला काँग्रेसच्या हातून गेले असताना पूर्व विदर्भातील चंद्रपूर काँग्रेस नेत्यांनी दिल्ली दरबारी नमते घेतल्याने हातून जात असताना मिळाल्याचे सध्या तरी दिसत आहे.
नेत्यांचा बेबनाव, समन्वयाचा अभाव यात काँग्रेसच्या हातून सत्ता जावी म्हणून भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी देव पाण्यात ठेवले असे म्हटले तर नवल नाही. मात्र, वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर यांच्यातील टोकाला गेलेला संघर्ष या मनपा निवडणुकीनंतरच्या घडामोडीत अधिक गडद झाला.
भाजपने ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आ. किशोर जोरगेवार यांच्यातील वादातही सत्तेचा मार्ग कसा सापडेल याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, सारे काही हातून गेल्यावरही काँग्रेस नेत्यांना ‘गुस्सा क्यो आता हैं ...’ असे चित्र सर्वसामान्यांना अस्वस्थ करणारे दिसले. शेवटी ‘दो कदम तुम चलो, दो कदम हम चले...’ या न्यायाने अडीच वर्षे धानोरकर गटाला महापौर, तर वडेट्टीवार गटाला उपमहापौर आणि उद्धव ठाकरे गटाला स्थायी समिती अध्यक्षपद असा तोडगा निघाला.
वडेट्टीवार यांच्याकडून विभागीय आयुक्तांविरोधात दाखल याचिका मागे घेतली गेली. एका जागेसाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रत्यक्षात निवडणुकीला दोन दिवस असल्याने अद्यापही राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे.
नागपुरात तिजोरी कुणाच्या हाती?
नागपुरात सत्ता पक्षनेतेपदी बाल्या बोरकर, महापौर म्हणून नीता ठाकरे, उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांची निवड झाली. मात्र, दुसरीकडे मनपाची तिजोरी मानली जाणाऱ्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड खोळंबली. भाजपमध्ये सारे काही गुडी गुडी नाही हे उघड झाले. सदस्यच ठरले नाही त्यामुळे आता अध्यक्षपदासाठीही चर्चेत शिवानी दाणी यांच्याऐवजी भाजप अनपेक्षित धक्का देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.