नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नरेंद्र मोदी सरकार या देशातून जात आहे, हेच एक्झिट पोल दाखवत आहे. मात्र गोदी मीडियाने दाखवलेले एक्झिट पोल खरे नाहीत. महाराष्ट्रातही जनतेने मोदी सरकार विरोधात कौल दिलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले असा सनसनाटी आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी (दि.2) नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.
याबरोबरच मतमोजणी दिवशी शेवटचे ईव्हीएम मशीन बंद होईपर्यंत आपल्या मतमोजणी प्रतिनिधींनी जागा सोडू नये असे निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत. कारण, विजय इंडिया आघाडीचाच होणार आहे, असा दावा ही पटोले यांनी केला. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढली. तसेच मणिपूर ते मुंबईची न्याय यात्रा काढून लोकांची मते जाणून घेतली. दरम्यान या यात्रांमध्ये महागाई, बेरोजगारी आणि देशापुढील समस्यावर लोकांशी संवाद साधला.
मात्र, काल जे एक्झिट पोल जाहीर झाले ते खऱ्या अर्थाने योग्य नाहीत. मीडियाचे मालक हे गोदी मीडिया आहेत, असा आरोप पटोले यांनी केला. काल आपल्या जनमताचा अनादर होत असल्याचे बघून अनेकांनी टीव्ही बंद करून टाकले. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढाई होतील असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. जनमत विरोधात असतानाही आम्हीच जिंकणार हे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
शनिवारी (दि.1) या संदर्भात इंडिया आघाडीची बैठक पार पडली. राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही या दृष्टीने मार्गदर्शन केले. यामध्ये ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषता कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने एक्झिट पोल दाखवण्यात आले आहेत. मात्र निकाल विरुद्ध लागले, या निवडणुकीतही तेच होणार आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 ते 40 च्या मिळतील, आम्ही लोकांचा कौल बघितला आहे. महाराष्ट्रातील हा जो कौल आहे तो देशभरात राहील असा आमचा विश्वास आहे असा दावा पटोले यांनी केला.
हेही वाचा :