

नागपूर - काटोल तालुक्यातील कोतवालबर्डी येथील ऐशियन फायर वर्क्स येथे रविवारी दुपारी झालेल्या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले. ब्लोवरमध्ये हा ब्लास्ट कोळसा पावडर गरम करत असताना झाला. मृतकांची नावे भुरा लक्ष्मण रजक ( भिलमा शिवणी वय 25) मुनिम मडावी( घुगरी, मांडला शिवणी वय 28 )अशी आहेत. जखमीमध्ये सोहेल शेख, घनश्याम लोखंडे यांचा समावेश आहे.
कंपनीत स्फोट झाला त्यावेळी 31 कामगार कामावर होते. अनेक महिला यात होत्या. मात्र एकापाठोपाठ एक तीन आवाज झाल्यामुळे आम्ही बाहेर पळत निघालो त्यामुळे बचावलो अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना सरला चौधरी यांनी दिली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले असून जखमींवर उपचाराबाबत शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.
मी आज स्वतः घटनास्थळावर जाऊन संपूर्ण पाहणी केली. मध्यप्रदेशातील दोन्ही मृतकाच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे तसेच शासनातर्फे मृतकांच्या परिवाराकडून जितकी मदतीची मागणी करण्यात आली तेवढी मदत देण्यात यावी. तसेच सुरक्षा नियमावलीचे पालन झाले की नाही याची सुद्धा तपासणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये. यात काहीही हलगर्जीपणा झाल्यास कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी दिला आहे.