Nagpur Blast : नागपूर सोलर कंपनी दुर्घटना : मृत कामगारांच्या आठवणींनी नातेवाईकांना हुंदके अनावर

Nagpur Blast : नागपूर सोलर कंपनी दुर्घटना : मृत कामगारांच्या आठवणींनी नातेवाईकांना हुंदके अनावर
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर-अमरावती मार्गावर बाजारगाव येथील सोलर एक्स्प्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात १२ पैकी ९ कामगारांचा मृत्यू झाला. आज (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत कामगारांमध्ये ६ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. या कंपनीत स्फोटके तयार केली जातात. या घटनेत अनेक मजुरही गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Nagpur Blast)

मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे. (Nagpur Blast)

या घटनेनंतर आसपासच्या गावातून नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल होऊ लागले आहेत. अमरावती महामार्गावर वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांची दमछाक होत आहे. बहुतांशी मजूर आजूबाजूच्या खेड्यातून कंपनीची बस किंवा खासगी वाहनाने कामाला येतात. आजची सकाळ अशी भीषण उगवणार याची कल्पना कामगारांना नव्हती. मृत कामगारांच्या आठवणींनी नातेवाईक कासावीस झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. हजारोंच्या गर्दीत आप्तेष्ठांच्या, मित्रमंडळीच्या हुंदक्यांनी या घटनेची दाहकता अधिक वाढताना दिसली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात या दोन्ही घटना घडल्याने ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने आवश्यक निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

सध्या कंपनी खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आली आहे. आत अधिकारी, स्फोटक तज्ञाची टीम आहे. इतर युनिटच्या सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले. सोलर एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत तयार झालेल्या स्फोटकांच्या पॅकिंगचे काम सुरु होते. यावेळी हा स्फोट झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news