

Student killed Nagpur
नागपूर: अभियांत्रिकी तृतीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियावर झालेल्या वादात एका विद्यार्थ्यांची हत्या झाल्याची घटना घडली. पूर्व नागपुरातील एचबी टाऊन परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. नूर नवाज हुसैन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
तृतीय वर्षाला शिकणारा हर्षल रामटेके आणि दुसऱ्या वर्षाला शिकणारा किलेश्वर बीसेन यांच्यात सोशल मीडियावरील एका पोस्टवरून वाद सुरू होता. काही जणांनी मध्यस्थी केली. एकत्रित बसून यावर तोडगा काढू असे ठरवले. हा वाद सोडवण्यासाठी शुक्रवारी रात्री एचबी टाऊन परिसरात भेटीची वेळ ठरली. रामटेके त्याचा मित्र नूर नवाज हुसेन याला घेऊन आला. तर बीसेन याने अन्नू शेख या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला सोबत आणले.
मात्र, कमी होण्याऐवजी दोन्ही गटांत वाद वाढत गेला आणि अन्नू शेखने चाकू फिरवणे सुरू केले. यातच हुसेनच्या गुप्तांगावर चाकूने गंभीर जखम आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून यात संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. पारडी पोलिसांनी कारवाई करीत अन्नू शेख, किलेश्वर बीसेन आणि एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे.